विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून १०० टक्के बालविवाह मुक्त जिल्हा करू:सीईओ विवेक जॉन्सन

Wed 27-Nov-2024,11:22 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

चंद्रपूर : आपल्या देशात बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. जिल्ह्यातील बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्ह्यधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. भविष्यात आपल्या जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही, असा संकल्प करणे गरजेचे आहे. यात नवीन पिढीचे आणि विद्यार्थ्यांचे योगदान आवश्यक आहे. नवीन पिढीच ही परिस्थिती बदलवू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून आपला जिल्हा १०० टक्के बालविवाह मुक्त करू, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केला.भारतीय ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरद्वारा संचालित भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे बालविवाह मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी,बालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बासरकर, बाल न्याय मंडळाच्या सदस्या भावना देशमुख, रुदय संस्थेचे संचालक काशिनाथ देवगडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर आदी उपस्थित होते. जिल्हा महिला व बाल विकास विभाग चंद्रपूर पांच्या मार्गदर्शनात बाल संरक्षण कक्ष व असेस्ट टु जस्टिस फॉर चिल्ड्रन प्रकल्प या संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पुढे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, बालविवाहाचे प्रमाण शहरी भागात कमी असून ग्रामीण भागात जास्त असल्याचे निदर्शनास येते, त्यामुळे जास्तीत जास्त जनजागृती करून बालविवाह प्रतिबंधासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे,असेही त्यांनी सांगितले. मुख्य मार्गदर्शक सुमित जोशी यांनी बालविवाहाचे भारतातील वय व त्यासंदर्भात असलेल्या कायद्यांबाबत माहिती दिली.यावेळी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या हेतूने बालविवाह रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी बालविवाह मुक्त भारत पथसंचालन करून रॅली काढली. रॅलीची सांगता शाळेच्या पटांगणात करण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन प्रा. राजेश बारसागडे यांनी तर आभार शशिकांत मोकाशे यांनी मानले. कार्यक्रमाला परिविक्षा अधिकारी दिवाकर महाकाळकर, मोरेश्वर झोडे, सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बाकडे, गीता चौधरी, शाळेचे प्राचार्य सी.डी. तन्नीरवार, उपमुख्याध्यापक जे. एम टोंगे, पर्यवेक्षक मुप्पिडवार, डी. एल. कुरेकार यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.