मतदार जनजागृती ऑनलाईन स्पर्धेत अंकिता शेंडे आणि सुरज मदनकर विजेते
प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने SVEEP (Systematic Voters Education and Electoral Participation) उपक्रमांतर्गत विविध साप्ताहिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांचा मुख्य उद्देश १८ वर्षांवरील पात्र मतदारांची नोंदणी करणे, अधिकाधिक मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करणे व मतदान प्रक्रियेशी संबंधित महत्त्वपूर्ण
माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे.या अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये ४ प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन अंकिता देविदास शेंडे तर टॅगलाईन (आपल्या विकासात देऊ या योगदान चला सर्वांनी करू या मतदान) स्पर्धेत सुरज शंकर मदनकर विजेते ठरले आहेत. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते अंकिता शेंडे यांना ५ हजार व सुरज मदनकर यांना १० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू उपस्थित होत्या. एकूण पाच आठवड्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने सदर उपक्रम राबविला असून यात सोमवार ते शनिवार इच्छुक नागरिक सहभागी होऊ शकतील आणि प्रत्येक रविवारी त्या आठवड्याचे निकाल जाहीर करण्यात येतील. याअंतर्गत २३ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत प्रत्येक आठवड्यात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. ज्या गुगल फॉर्मद्वारे क्विझ, निबंध लेखन स्पर्धा, आणि मतदान प्रक्रियेवर आधारित व्हिडिओ तयार करण्याचे कार्यक्रम आहेत. सहभागी नागरिकांना लकी ड्रॉ द्वारे रोख व रोमांचक बक्षिसे दिले जातील.जिल्हा निवडणूक कार्यालयद्वारे बनवण्यात आलेल्या पुस्तिकाच्या आधारावर ही स्पर्धा घेण्यात येत आहे. उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या नागरिकांनी, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या किंवा जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. या वेबसाइटवर संबंधित साप्ताहिक स्पर्धांची माहिती व गुगल फॉर्म लिंक उपलब्ध आहे.