'त्या' जाळपोळ, गोळीबार प्रकरणाचे आरोपी शोधा
प्रतिनीधी रवि वाहणे शेदूर्जनाघाट
वरुड, मोर्शी मतदारसंघात २०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभा क्षेत्रातील शेंदूरजनाघाट ते धनोडी रस्त्यावर ऐन मतदानाच्या दिवशी पहाटेच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराचे वाहन पेटवून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेची रीतसर पोलिस तक्रार दाखल करण्यात आली
होती. या घटनेला पाच वर्षे पूर्ण होऊन सुद्धा आरोपी अजूनही मोकाट असल्याने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच एखाद्या उमेदवारावर परत गोळीबार होऊ शकतो.
त्या अनुषंगाने मागील घटनेतील आरोपीचा पोलिसांनी शोध घेऊन कारवाई करावी, अशा गुंडांना तत्काळ जेरबंद करावे व होऊ घातलेल्या निवडणुकीत उमेदवारांना सुरक्षा बहाल करावी, या मागणीसाठी मोर्शी विधानसभा न्याय हक्क समितीच्या वतीने बुधवारी, ९ ऑक्टोबरपासून उपोषण करण्यात येणार आहे.
ज्यांच्यावर हल्ला झाला ते या मतदारसंघाचे आज आमदार आहेत व ज्या व्यक्तीवर हल्ला घडवून आणल्याचा आरोप होता, ती व्यक्ती आज राज्यसभा खासदार आहे. तरीसुद्धा आजपर्यंत या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन गुन्हेगाराला शिक्षा झाली नाही. आमदार झालेली व्यक्ती स्वतः साठी न्याय मागू शकली नाही. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही महिन्यांपूर्वी या संदर्भात उपोषण करण्यात आले होते.
तेव्हा मोर्शी उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी १५ दिवसांत चौकशी सुरू करू, असे आश्वासन दिले होते. परंतु, या प्रकरणाची चौकशीच न झाल्याने सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली पोलिस यंत्रणा काम तर करीत नाही
ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
दरम्यान, घडलेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये व २०२४ मध्ये विधानसभेकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे.
येत्या काळात राजकीय स्वार्थासाठी कोण कोणाचा घातपात करेल व सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करेल, इच्छुक उमेदवारावर आकसापोटी कोण हल्ला घडवून आणेल, अशी भीती व शंका निर्माण झाल्याने पोलिस प्रशासनाने त्वरित या प्रकरणाची चौकशी करून दोषी व्यक्तीस जेरबंद करावे, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.