*राज्य स्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 मध्ये हिंगोली जिल्ह्यातील करुणादेवी साबळे-राऊत राज्यात प्रथम*
प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगो ली : जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्डी बु.येथिल शिक्षिका सौ. करुणदेवी साबळे-राऊत यांनी 3री ते 5 वी गटात भाषा विषयांमध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.रविवार दि. 29 सप्टेंबर रोजी राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांच्या हस्ते पुणे येथे त्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांसाठी आयोजित दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 चा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी परिषदेच्या महात्मा फुले सभागृहात संपन्न झाला . यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन श्री केसरकर यांच्या हस्ते झाले.
शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार, नवी दिल्ली येथील केंद्रीय सहसचिव अर्चना अवस्थी , राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे,महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक आर विमला, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार, योजना कार्यालयाचे संचालक महेश पालकर, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाचे संचालक शरद गोसावी, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक संपत सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे, परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे, उपसंचालक डॉ.कमलादेवी आवटे, डॉ. माधुरी सावरकर, ज्योती शिंदे आदी मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते.
जिल्हा शिक्षणाधिकारी श्री संदीप सोनटक्के, डायटचे प्राचार्य डॉ. दिपक साबळे यांनी त्यांचे अभिनंदन केले. पार्डी बु. येथील मुख्याध्यापक श्री शेख सर, केंद्रप्रमुख भोसले सर यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले.
तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर प्रथम येण्याचा बहुमान सौ. करुणादेवी साबळे-राऊत यांनी पटकावला आहे.
शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी; यासाठी राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक प्रशिक्षक यांच्यासाठी तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची स्पर्धा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आली.
राज्यांतील 408 तालुक्यात, 36 जिल्ह्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर विषय व गटनिहाय प्रथम तीन क्रमांक निवडण्यासाठी तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर क्षेत्रीय अधिकारी व पुरस्कार प्राप्त शिक्षक यांची समिती गठीत करून अंतिम मूल्यमापन करण्यात आले. शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 साठी 36 जिल्ह्यातील 408 गटातील 18221 उमेदवारांचे पोर्टलद्वारे अर्ज प्राप्त झाले होते.