लाडक्या बहिणींना महागाईचा झटका जोर से, लसनाला मटणाचा भाव, तेलाचे दरही गगनाला
अरबाज पठाण ( वर्धा )
गेल्या काही महिन्यांपासून महागाईने सर्वसामान्य त्रस्त झाला आहे. त्यातच आता खाद्यतेल आणि इतर अनेक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहे. अनेक छोट्या-मोठ्या शहरात 500 रुपयांची नोट सुद्धा कमी पडत आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागात वस्तूंचे भाव कडाडले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या जीवाला घोर लागला आहे.
पालेभाज्यांचा दिलासा
हिवाळ्यामुळे पालेभाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. नवी मुंबईतील APMC भाजी मार्केटमध्ये हिवाळा सुरू असल्याने पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. त्यामुळे पालेभाज्यांच्या किमतींमध्ये 30% घट झाली आहे सध्या पालेभाज्या प्रति 10 रुपये दराने विकल्या जात आहे. मागील तुलनेत हा दर खूपच कमी आहे.
लसणाचा भाव वधारला
नवी मुबंईतील एपीएमसी मार्केटमध्ये लसणाचे भाव वाढले. एपीएमसी बाजारपेठेत सध्या लसणाचे दर 450 ते 480 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या काही आठवड्यांच्या तुलनेत लसणाच्या दरात प्रति किलो 20 रुपयांची वाढ झालेली आहे. व्यापार्यांच्या म्हणण्यांनुसार, सध्या बाजारात लसणाचा पुरवठा कमी असल्यामुळे भाव वाढले आहेत.
खाद्यतेलाने आणले जेरीस
तेलाच्या दरवाढीमुळे ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे. गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. गणपती उत्सवापासून आतापर्यंत तेलाचे दर झपाट्याने वाढले आहेत. सध्या मार्केटमध्ये सूर्यफूल तेलाचा 15 किलोचा भाव 2280 रुपये, पाम तेलाचा 2180 रुपये, तर सोयाबीन तेलाचा भाव 2050 रुपये आहे. व्यापार्यांच्या मते पाम तेलाच्या दरात तब्बल 300 रूपयांची वाढ झाली असून, सूर्यफूल तेलावर 25% आयात शुल्क लावल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या तरी सोयाबीन तेलाचे भाव कमी आहे.