बेपत्ता व्यापारी महिलेचा बडतर्फ पोलिस कर्मचाऱ्यांनी केली गळा दाबून हत्या
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : मागील १५ दिवसांपासुन चिमुर येथील बेपत्ता व्यापारी महिलेचा मृतदेह मंगळवारी नागपूर येथील बेलतरोडी परिसरातील निर्जनस्थळी आढळला . व्यापारी महिलेची हत्या दुचाकी चोरीप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलिसच निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी चंद्रपूर शहर पोलीसांनी बडतर्फ पोलिस कर्मचाऱ्यांला अटक केली.नरेश डाहुले (४०)रा.तुकुम,चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चिमूर येथील देवांश जनरल स्टोअर्सच्या संचालिका अरुणा अभय काकडे (३७) या २६ नोव्हेंबरला नागपूर येथील इतवारी मार्केटमध्ये दुकानातिल साहित्य खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या त्या उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र विचारपूस केली. मात्र, त्यांचा काही शोध लागला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी चिमूर पोलिसांत मिसिंगची तक्रार दाखल केली. या तक्रारीत इतवारी येथून हरविल्याची नोंद करण्यात आली. पोलिसांकडून संथगतीने तपास सुरू असल्याने जिल्हा व्यापारी मंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन या प्रकरणाकडे लक्ष वेधले. पोलिसांनी प्रकरणाला गांभीर्याने घेतले.
दरम्यान,६ डिसेंबरला दुचाकी चोरीप्रकरणात आरोपी नरेश डाहुले याला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. शनिवारी न्यायालयात हजर करून पोलिसांनी पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने आरोपी नरेशला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
याचदरम्यान, आरोपींची कॉल रेकॉर्डची तपासणी करीत असताना सदर बेपत्ता महिलेसोबत बोलणे झाल्याचे निदर्शनास आले. पोलिसांचा संशय बळावल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा तपास चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार प्रभावती एकुरके यांच्याकडे सोपविला. यावेळी पोलिसांनी पोलिसी हिसका दाखविल्यानंतर बेपत्ता असलेल्या महिलेचा खून केल्याची आरोपीने कबुली दिली. २६ नोव्हेंबरला अरुणा काकडे हिची नागपुरात भेट झाली. अरुणा वर्ग मैत्रीण असल्याने आमची चांगली ओळख होती.
त्यादिवशी आम्ही दिवसभर सोबत होतो. त्यानंतर रेशीमबाग मैदानावर आमच्या दोघांत वाद झाला. यावेळी रागाच्या भरात अरुणाचा गळा आवळून खून केला व नंतर आपल्या चारचाकी वाहनात अरुणाचा मृतदेह बेलतरोडी येथील निर्जनस्थळी असलेल्या घरातील शौचालयाच्या टाक्यात टाकून दिल्याचे सांगितले.
आरोपीने सांगितले घटनेनुसार चंद्रपूर पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला. बेलतरोडी येथील परिसरात मृतदेह आढळताच पोलिसांनी कुटुंबीयांना बोलावून मृतदेहाची ओळख पटविली. यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. याप्रकरणी चंद्रपूर पोलिसांनी खुनाच्या प्रकरणात आरोपी नरेश डाहुले याला अटक केली. पुढील तपास ठाणेदार प्रभावती एकुरके करीत आहे.
आरोपीवर लाखोंचे कर्ज -
घरफोडी, दुचाकी चोरीप्रकरणी सराईत आरोपी असलेला नरेश डाहुले याच्या या प्रकरणामुळे पोलीस विभागाची बदनामी झाली. अनेकदा त्याला अटक झाल्याने जिल्हा पोलीस प्रशासनाने बडतर्फ केले होते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीदरम्यान तसेच आयपीएल सट्टयामध्ये लाखोंचे कर्ज अंगावर झाल्याने डाहुले याने घरफोडीचे गुन्हे करण्यास सुरुवात केली. वर्षभरानंतर त्याला हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यात अटक झाली.