अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई ८ लाख ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त
तालुका प्रतिनिधी:अजय दोनोडे आमगाव
गोंदिया:गोदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील रेती घाटावरून अवैधरित्या रेती उपसा व विक्री सुरू आहे. काही दिवसापुर्वीच तिरोडा तालुक्यातील रेती घाटावर कारवाई करण्यात आली होती.मात्र त्यानंतरही हा प्रकार सुरू आहे. अशातच आमगाव तालुक्यातील वाघ नदी पात्रातून अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून तस्करी होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी चार ट्रॅक्टर वर कारवाई करून एकूण ८ लाख ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.आमगाव तालुक्यातील वाघ नदी पात्रातून तसेच मानेकसा घाटातील रेतीचे उत्खनन करून रेतीची तस्करी होत असल्याची माहिती पोलिस प्रशासनाला मिळाली.दरम्यान आरोपी वाहन मालक विनोद शेंडे व इतर तीन ट्रॅक्टरवर ही कारवाई करण्यात आली.यामध्ये प्रत्येकी १ ब्रास रेती व ट्रॅक्टर किंमत असा एकूण ८ लाख ५६ हजार रुपयाचा मुद्देमाल विनापास परवाना आढळून आला.पोलिसांनी कारवाई करून हा मुद्देमाल जप्त केला. फिर्यादी पो.शि.दिनेश वानखेडे यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.पुढील तपास पो.हवा.खुशाल बर्वे करीत आहेत.