अल खिदमत फाउंडेशनतर्फे चौथ्या सामूहिक विवाह सोहळ्याचा भव्य आयोजन
अब्दुल कदीर बख्श
हिंगणघाट:हिंगणघाट येथील अल खिदमत फाउंडेशनच्या वतीने चौथ्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन जूना सरकारी दवाखाना येथील भव्य मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमात विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या २५ जोडप्यांचे निकाह पार पडले गेल्या चार वर्षांपासून अल खिदमत फाउंडेशनतर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश समाजातील अनावश्यक खर्च आणि जुन्या रूढी-परंपरांचा अंत करणे हा आहे. या सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व जोडप्यांनी आपली सहमती दर्शवून विवाह केला. यावेळी शहरातील सर्व मशिदींचे इमाम हजरत उपस्थित होते आणि त्यांनी नवविवाहित जोडप्यांसाठी खास दुआ केली.सध्याच्या काळात विवाह सोहळ्यांमध्ये होणारा फिजूल खर्च आणि दिखाव्याच्या प्रथांमुळे सामान्य कुटुंबांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.अशा परिस्थितीत सामूहिक विवाहाचा हा उपक्रम आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांसाठी एक आशेचा किरण ठरत आहे.
आयोजन कमिटीने नवविवाहित जोडप्यांना गृह उपयोगी वस्तू भेट दिल्या. तसेच नारायण सेवा मित्र परिवार आणि रोटरी क्लबने देखील सर्व जोडप्यांना विशेष भेटवस्तू दिल्या. या सोहळ्याने समाजात एकोपा आणि सहकार्याचे उदाहरण निर्माण केले आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये हिंगणघाटच्या तरुणांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी प्रत्येक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. फाउंडेशनने त्यांच्या सहकार्याबद्दल विशेष आभार मानले.निकाहनंतर नवविवाहित जोडप्यांनी आपल्या नव्या जीवनाच्या सुरुवातीबद्दल आनंद व्यक्त केला आणि आयोजन कमिटीचे मनःपूर्वक आभार मानले. उपस्थित इमाम हजरत आणि पाहुण्यांनी सर्व जोडप्यांना सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.अल खिदमत फाउंडेशनचा हा उपक्रम समाजामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी आणि हुंडा प्रथा व इतर सामाजिक वाईट प्रथांना संपविण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.