नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे-पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर, : जिल्ह्यामध्ये 1 ते 30 जानेवारी 2025 या कालावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलिस विभागाच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनमालक व चालकावर मोटार वाहन विभागातंर्गत कार्यवाही करण्यात येणार आहे. तेव्हा दारु पिऊन किंवा विना सिटबेल्ट तसेच विना हेल्मेट वाहने चालवू नये.सर्व नागरिकांनी वाहतुकीच्या रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले.जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांच्या मार्गदर्शनात रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मनपा आयुक्त विपिन पालीवाल, पोलीस निरीक्षक (वाहतूक) प्रवीणकुमार पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे,सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम, ड्राइविंग स्कूलचे संचालक,वाहन मालक व चालक,ऑटो रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी, कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी शहरातील जनतेला वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे म्हणाले,अपघातात दुचाकीस्वाराचे प्रमाण अधिक असते.त्यातही डोक्याला मार लागून होणाऱ्या मृत्यूची संख्या अधिक असते. त्यामुळे हेल्मेटचा वापर अत्यंत आवश्यक आहे.वाहन चालविताना वेळेचे नियोजन करावे.वेगात वाहन चालवू नये. वाहन चालविताना संयम बाळगणे व वहातूकीच्या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे.दुचाकी वर तिघेजण बसून प्रवास करू नये. कर्कश आवाज करणारे हॉर्न लावू नये, असे आवाहन त्यांनी वाहन चालक, मालकांना केले.या कालावधीमध्ये कार्यालयात तसेच टोल नाक्यावर नेत्र तपासणी, आरोग्य तपासणीचे कार्यक्रम घेण्यात येईल. तसेच वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या चालक- मालकावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे म्हणाले.कार्यालयीन अधीक्षक प्रविण अदेंकिवार यांनी उपस्थितांना अपघाताची गंभीरता, वाहन चालक व मालकाची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. सदर रस्ता सुरक्षा अभियान जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षा माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शिवाजी विभुते यांनी तर आभार पोलीस निरीक्षक (वाहतूक) प्रवीणकुमार पाटील यांनी मानले.