बल्लारपूरमध्ये होणार राज्यातील उत्कृष्ट न्यायालयीन इमारत

Tue 25-Feb-2025,11:26 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर 

बल्लारपूर न्यायालयाच्या नवीन इमारत बांधकामाचा घेतला आढावा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास 

चंद्रपूर, दि. 23 : बल्लारपूर येथे नवीन न्यायालयाची इमारत उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून, या प्रकल्पासाठी रु. 36 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या इमारतीत सौरऊर्जा प्रणाली, अत्याधुनिक लिफ्ट सुविधा, महिला वकिलांसाठी हिरकणी कक्ष, डिजिटल सुविधांनी सुसज्ज ई-लायब्ररी, तसेच परिसराचे सौंदर्य खुलविण्यासाठी लँडस्केपिंग आदी अत्याधुनिक सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे. ही न्यायालयीन इमारत केवळ बल्लारपूरच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील उत्कृष्ट न्यायालयीन इमारतींपैकी एक ठरेल,असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.बल्लारपूर विश्रामगृह येथे न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाबाबत आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी,मुकेश टांगले कार्यकारी अभियंता,संजोग मेंढे उपअभियंता ,पवन सावरकर कनिष्ठ अभियंता,ॲड.आशिष धर्मपुरीवार,ॲड. आय.आर.सय्यद,ॲड बुराडे,ॲड.विकास गेडाम,ॲड.भाले,ॲड. लिंगे,ॲड उपाध्याय,ॲड. जिवणे,ॲड.पिंपळकर, ॲड.पोसलवार,ॲड. हस्ते,ॲड.आमटे,ॲड. खर्तड,ॲड.तित्रे,ॲड. गेडाम,ॲड.केशवानी, ॲड भाळे,ॲड. बाजपेयी,ॲड.अविनाश सिंग, ॲड. खनके आदीची उपस्थीती होती.आमदार मुनगंटीवार पुढे म्हणाले, भविष्यातील गरजांचा विचार करून, 100 वकिलांसाठी स्वतंत्र इमारत उभारण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सदर न्यायालयीन इमारतीमध्ये सोलर व्यवस्थेसह प्रत्येक मजल्यावर आरो मशीनसह स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. ई-लायब्ररी, वकिलांसाठी विशेष ॲडव्होकेट कॉन्फरन्स हॉल, महिलांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष, आधुनिक सुसज्ज स्वच्छतागृहे, तसेच सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. अखंड वीजपुरवठासाठी 200 केव्ही क्षमतेचा जनरेटर, तसेच महत्वाच्या दस्तऐवजांच्या सुरक्षिततेसाठी लॉकर्स आणि कॉम्पॅक्टरची व्यवस्था करावी. वाहनांसाठी नियोजनबद्ध पार्किंग सुविधा याशिवाय, इमारतीसाठी उत्कृष्ट दर्जाचे टिकवुडचा फर्निचरसाठी वापर करण्याचे निर्देश संबंधितांना दिलेत. पुढील दोन ते तीन महिन्यांत वकिलांच्या उपस्थितीत या इमारतीचे भूमिपूजन करण्याचा निर्णय वकील परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू करण्यात येणार आहे. सदर इमारत महाराष्ट्राच्या उत्तम न्यायालयाच्या इमारतीपैकी एक असेल असा विश्वास देखील श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.