चंद्रपूर हे भविष्यात भारतातील नामांकित पायलट प्रशिक्षण केंद्र बनेल - खासदार राजीव प्रताप रुडी

Fri 21-Feb-2025,12:53 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर 

चंद्रपूर : मोरवा फ्लाईंग क्लब उत्तम पायलट घडवणारे केंद्र बनेल - आमदार सुधीर मुनगंटीवार

मोरवा येथील फ्लाईंग क्लबचे उद्घाटन

चंद्रपूर, दि. 20: मोरवा फ्लाईंग क्लबच्या माध्यमातून भारतीय पायलट जागतिक स्तरावर नाव कमावतील, चंद्रपूरमध्ये हे प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे प्रयत्न केले आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे. येणाऱ्या काळात अशा प्रकारच्या अनेक संस्था संपूर्ण महाराष्ट्रात स्थापन करण्यात येईल. चंद्रपूर हे भारतातील सर्वात मोठे आणि नामांकित पायलट प्रशिक्षण केंद्र बनेल,अशी अपेक्षा खासदार तथा एअरो क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजीव प्रताप रुडी यांनी व्यक्त केली. मोरवा विमानतळ येथे फ्लाईंग क्लबच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मोरवा फ्लाईंग क्लब उत्तम पायलट घडवणारे केंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त केला.यावेळी माजी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री तथा एअरो क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार राजीव प्रताप रुडी,आमदार सुधीर मुनगंटीवार,आमदार किशोर जोरगेवार,जिल्हाधिकारी विनय गौडा,उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, पायलट प्रशिक्षक एरियल ऑरेंसन,भाजपा महानगर अध्यक्ष राहुल पावडे, सुरज पेद्दूलवार,प्रज्वलंत कडू,सर्व शासकीय अधिकारी,पायलट प्रशिक्षणार्थी,पक्ष पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. खासदार राजीव प्रताप रुडी म्हणाले, चंद्रपूरच्या युवक-युवतींना भविष्यात स्वतःच्या शहरातील विमानतळावरून प्रशिक्षण घेऊन भारताच्या विमानात पायलट म्हणून बसता येईल,असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकार घेत आहे. देशगौरव,पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतात अशा प्रकारच्या पायलट प्रशिक्षण केंद्रांची संकल्पना पुढे येत आहे. सध्या भारतीय तरुणांना पायलट प्रशिक्षणासाठी फिलिपिन्स, युरोप आणि अमेरिकेत जावे लागते. मात्र,अत्यंत कमी खर्चामध्ये चंद्रपूरमध्ये हे प्रशिक्षण उपलब्ध झाल्यास येथील तरुण पायलट होऊन संपूर्ण जगभरात आपला ठसा उमटवतील. सध्या येथे ५ विमाने उपलब्ध असून, आणखी ५ विमानांची आवश्यकता आहे. यासोबतच प्रशिक्षणार्थ्यांसाठी होस्टेल आणि अत्यावश्यक सुविधा लवकरच पूर्णत्वास येणार आहेत. भारतात कमर्शियल पायलट प्रशिक्षणासाठी ६० ते ७० लाख रुपये, तर परदेशात जाऊन प्रशिक्षण घेण्यासाठी १ कोटी ते १.५ कोटी रुपये खर्च येतो. मात्र,चंद्रपूरमध्ये हे प्रशिक्षण तुलनेने कमी खर्चात आणि उच्च दर्जाच्या सोयींसह उपलब्ध होईल. त्यासोबतच येणाऱ्या काळामध्ये हॉट एअर बलून,एअरस्पोर्ट,पॅराग्लायडिंग आदी बाबी करण्यात येईल.असेही ते म्हणाले.मुलींच्या शिक्षणाला नवी दिशा मिळेल - आमदार सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरमध्ये श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाचे उपकेंद्र उभे राहत आहे या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी नवी दिशा मिळणार आहे.तसेच कृषी महाविद्यालय, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल आणि पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहेत.अशा परिस्थितीत, वैमानिक प्रशिक्षण क्षेत्रातही जिल्ह्याने पुढे राहावे, यासाठी मोरवा विमानतळाचा विकास करण्यात येत आहे. मोरवा विमानतळावर हँगर, कार्पेट रनवे आणि संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले असून, सध्या येथे पाच विमाने उपलब्ध आहेत. लवकरच आणखी पाच विमाने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे विमानतळ चांगले पायलट घडवणारे केंद्र बनेल, असा विश्वास आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.चंद्रपूरच्या विकासासाठी 'हम साथ साथ है'मुनगंटीवार पुढे म्हणाले, नागपूर फ्लाइंग क्लबच्या शाखेचे उद्घाटन करण्यासाठी खासदार राजीव प्रताप रुडी यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. “मिशन शौर्य अंतर्गत आदिवासी युवकांना प्रशिक्षण देऊन 29 हजार 29 फूट उंचीच्या एव्हरेस्ट शिखरावर पोहोचवण्यात आले. त्यामुळे चंद्रपूरच्या तरुण-तरुणींमध्ये मोठी क्षमता आहे. भविष्यात चंद्रपूरचे विमानतळ सी फॉर चंद्रपूर आणि पायलट प्रशिक्षण क्षेत्रात सी फॉर चॅम्पियन म्हणून ओळखले जाईल. तसेच पर्यटन क्षेत्रातही विकासासाठी हॉट एअर बलून प्रकल्प सुरू करण्याचा मानस आहे.” जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी 'हम साथ-साथ हैं' या भावनेतून पुढे जाण्याचा संकल्प आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.