मनपा करणार उष्माघात कृती आराखडा २०२५ ची अंमलबजावणी

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
चंद्रपूर : चंद्रपूर शहर हॉट सिटी म्हणून संपूर्ण जगात ओळखले जाते. आता उन्हाळ्याच्या दिवसांना सुरवात झालेली आहे. दरवर्षी येथील सूर्याचा पारा उच्चांक गाठतो. अशा तप्त उन्हात नागरिक उष्माघाताला बळी पडू नये यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका उष्माघात कृती आराखडा राबविणार आहे. याकरीता २७ फेब्रुवारी रोजी उष्माघात कृती आराखडा समन्वय समितीची बैठक अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनपा स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती.याप्रसंगी मार्गदर्शन करतांना अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांनी सांगीतले की, कोरोना काळाचे वर्ष सोडता २०१६ पासून दर उन्हाळ्यात चंद्रपूर मनपातर्फे आरोग्य विभागातर्फे उष्माघात कृती आराखड्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यावर्षी अधिक कडक उन्हाळा राहण्याची शक्यता आहे. आज समितीची प्रथम आढावा बैठक असुन १५ मार्च पर्यंत समितीच्या सर्व सभासदांनी नेमुन दिलेली कार्ये जबाबदारीने पार पाडून त्याचा लेखी अहवाल द्यावा.उन्हाळ्यात घर थंड राहण्यास नागरीकांनी कुल रूफ टेक्नोलॉजीचा वापर करावा म्हणजेच उष्णतारोधक पेंट जर घराच्या छतावर मारले तर २ ते ३ डिग्री तापमान कमी होण्यास मदत मिळते. मागील वर्षी शहरात २१ जागी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली होती. यावर्षी त्याहुन अधिक पाणपोईची व्यवस्था स्वयंसेवी संस्थां व चिल्ड वॉटर असोसिएशनतर्फे करण्यात यावी. घर बांधकामाच्या रचनेत उष्णता कमी करण्याच्या दृष्टीने बदल करणे आवश्यक आहे.बेघर आणि भिकारी यांची व्यवस्था बेघर निवाऱ्यात करणे, अनेकदा भिकारी बेघर निवाऱ्यात येत नाही तेव्हा पोलीस विभागाला सोबत घेऊन नियोजन करणे तसेच मानसीक रुग्ण यांच्यासाठीही अॅक्शन प्लॅन तयार करण्यात येईल. काही तात्पुरते व कायमचे प्रवासी निवारे मनपा व स्वयंसेवी संस्थांद्वारे तयार करण्यात यावे. स्वयंसेवी संस्था व दुकानदार यांनी जर आपल्या दुकानासमोर पाण्याच्या कॅन किंवा पाण्याची व्यवस्था करावी, व्यापारी संघटनांनी याचे नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.महाकाली यात्रेला निवाऱ्यासाठी शेड तसेच पाण्यासाठी स्प्रिंकलर्सची व्यवस्था दरवर्षी मनपातर्फे करण्यात येते तसेच स्प्रिंकलर्स शहरात इतर कुठे लावता येईल याची निश्चिती करणे, ट्रॅफीक सिग्नल दुपारी बंद ठेवणे, सार्वजनिक खेळांचे आयोजन दुपारी न करणे, सार्वजनिक बगीचे सुरु राहण्याच्या वेळेत वाढ करणे, १०८ रुग्णवाहिकेचा सहभाग, बांधकाम कंत्राटदाराद्वारे मजुरांच्या कामाच्या वेळेत बदल व व्यापक जनजागृती करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. यावेळी डॉ. नवना उत्तरवार यांनी पावर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे सदस्यांना हीट अॅक्शन प्लॅन संबंधी विस्तृत माहिती दिली.याप्रसंगी उपायुक्त मंगेश खवले, सहायक आयुक्त अक्षय गडलिंग, शुभांगी सूर्यवंशी, संतोष गर्गेलवार, उपअभियंता रवींद्र हजारे, डॉ.जयश्री वाडे,डॉ.विजया खेरा.डॉ.अश्विनी भारत,डॉ.अमोल शेळके, डॉ.योगेश्वरी गाडगे,डॉ.शरयु गावंडे,डॉ.आरवा लाहिरी, डॉ.नरेंद्र जनबंधू,तसेच विविध शासकीय कार्यालय व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थीत होते.