पानगावच्या तलावात पाहुण्यांचे पहिल्यांदाच आगमन पक्षी निरिक्षक प्राध्यापक डॉ. संतोष पुरी यांचे पक्षी निरीक्षण

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा:गोंदिया जिल्हा हा तलावाचा जिल्हा म्हणुन ओळखला जातो कारण छोटे मोठे असे एकूण एक हजार पेक्षा जास्त तलाव गोंदिया जिल्ह्यात आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात हिवाळ्यात अनेक विदेशी पक्षी येत असतात. नुकताच हिवाळा संपत आला असुन, बरेच पक्षी परतीच्या मागे लागले आहेत. काही पक्षांपैकी ग्रेलेग गूज (अन्सर अन्सर) म्हणजेच कलहंस हे पक्षी नुकतेच दिनांक १५ फेब्रुवारी ला पाणगावच्या तलावात आढळून आले. शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय सालेकसा येथील प्राणीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. संतोष पुरी शनिवारी सालेकसा वरुण आमगाव ला स्कुटी ने जात असताना त्यांना अचानक हे पक्षी पानगाव च्या तलावात दिसले, त्यांनी लगेच त्या पक्ष्यांचे छायाचित्र काढले. एकूण १२ पक्षी आढळले. हा पक्षी अँसर वंशातील राखाडी हंसांपैकी सर्वात मोठा असुन, त्याचे शरीर गोलाकार, मोठे, जाड आणि लांब मान, डोके आणि चोच मोठी आहे. त्याचे पाय गुलाबी असतात आणि चोच नारिंगी किंवा गुलाबी रंगाची असते. हे पक्षी सामान्यपणे नदी, सरोवरे, धानाच्या शेतीत, गावताच्या भागात आढळतात. दुसऱ्या कुठल्यातरी मोठ्या तलावातून हे पक्षी उडत उडत पानगावच्या तलावात आले असावे आणि ते आता आपल्या माहेरघरी परत जात असावेत. हे पक्षी गवत, मुळे, बियाणे आणि धान्य खातात. हे हंस सहसा मिलनसार असतात, परंतु घरटे बांधताना ते खूप हिंसक होतात.हे पक्षी सालेकसा तालुक्यात पहिल्यांदाच आढळले असुन त्यांची प्रथम नोंद तालुक्यात होत आहे. अशी माहिती पक्षी निरिक्षक प्राध्यापक डॉ. संतोष पुरी यांनी दिली आहे. डॉ. पुरी हे गोल्ड मेडलिस्ट असुन "गोंदिया जिल्ह्यातील पक्ष्यांची जैवविविधता" या विषयात पी. एच. डी. आहेत.