वायगांव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर व प्लास्टिक निर्मूलन जनजागृती कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी=पवन ढोके वरोरा
भद्रावती - दि. 13-02-2025, वायगांव येथे सामाजिक बांधिलकीतून मोफत आरोग्य तपासणी व प्लास्टिक निर्मूलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत वायगाव, जय हिंद फाउंडेशन वायगाव, स्पेनल फाउंडेशन भद्रावती यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.आरोग्य तपासणी शिबिरात उत्स्फूर्त सहभाग या शिबिरात डॉक्टर, आरोग्य तज्ज्ञ व स्वयंसेवक यांच्या सहकार्याने नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. रक्तदाब, मधुमेह, दृष्टी तपासणी, हृदयविकार निदान आदी चाचण्या घेण्यात आल्या. तसेच, आवश्यक त्या औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. डॉक्टरांनी आरोग्यदायी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन केले व संतुलित आहार, नियमित व्यायामाचे महत्त्व पटवून दिले.प्लास्टिक निर्मूलन मोहिमेला नागरिकांचा पाठिंबा पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने या वेळी प्लास्टिक मुक्ती जनजागृती मोहीम राबविण्यात आली. उपस्थित नागरिकांना व गावातील जिल्हा परिषद शाळा व श्री जगन्नाथ बाबा हायस्कूल मुलानां प्लास्टिकच्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली आणि कापडी पिशव्या,ज्यूट बॅग यांचे वाटप करण्यात आले.स्थानिक नागरिकांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत प्लास्टिकचा वापर कमी करण्याची शपथ घेतली.मान्यवरांचे मार्गदर्शन व सत्कार या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून आशुतोष सपकाळ (BDO), डॉ.आसुटकर (आरोग्य अधिकारी),डॉ.पालिवाल(प्लास्टिक निर्मूलन समिती चंद्रपूर) यांची उपस्थिती लाभली. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा सामाजिक उपक्रमांना भविष्यातही पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भावना कुरेकार (सरपंच वायगाव) कार्यक्रम आयोजक, डॉक्टर आणि स्वयंसेवकांचा विशेष सत्कार करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी नागरिकांनी आरोग्य तपासणी आणि प्लास्टिक निर्मूलन उपक्रमाची गरज व्यक्त केली. "असे उपक्रम वारंवार होणे आवश्यक आहे,"अशी भावना अनेकांनी मांडली.मोफत आरोग्य तपासणी आणि प्लास्टिक निर्मूलन या दोन्ही उपक्रमांनी सामाजिक व पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण कार्य केले. येत्या काळातही असे कार्यक्रम राबविण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी काकडे तसेच आभार प्रदर्शन वच्छला नागोसे नी केले.