अग्रवाल विज्ञान महाविद्यालय जागतिक महिला दिन साजरा

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा-सालेकसा शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय सालेकसा येथे दि. 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. एन.मूर्ती तर प्रमुख अतिथी छायाताई नागपुरे जिल्हा परिषद सदस्य गोंदिया व विमलताई कटरे जिल्हा परिषद सदस्य गोंदिया हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले. आपल्या प्रास्ताविकामध्ये डॉ.अपर्णा खुरसेल यांनी कार्यक्रमाच्या रूपरेषेबद्दल विस्तृत माहिती दिली. या दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये प्रा सविताताई बेदरकर सामाजिक कार्यकर्ता गोंदिया, अमृता सुतार नायब तहसीलदार सालेकसा व रविता मेंढे सरपंच ग्राम गिरोला यांना महाविद्यालयातर्फे शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्याबद्दल गौरविण्यात आले. आपल्या मनोगतामध्ये सत्कारमूर्तींनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांच्या कार्यायाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर प्रमुख अतिथी नागपुरे मॅडम यांनी महिलांचे आजची परिस्थिती या विषयावर विस्तृत विवेचन केले तर कटरे मॅडम यांनी आपण महिला म्हणून समाजात वावरत असताना कोण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात त्या विद्यार्थिनींना समजावून सांगितल्या. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ.मूर्ती यांनी जागतिक महिला दिन साजरा करण्याचे कारणे काय आहेत हे उदाहरणासह स्पष्ट केले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.गिरिश देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.गौरी आडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व प्रवेशित विद्यार्थी प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.