दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

Thu 13-Feb-2025,04:14 AM IST -07:00
Beach Activities

अरबाज पठाण ( वर्धा )

कारंजा ( घा.) येथील स्थानिक मॉडेल हायस्कूल येथे १२ फेब्रुवारी बुधवार रोजी शैक्षणिक सत्र २०२४-२५ मधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या वर्ग १० वी च्या सर्व विद्यार्थ्यांना वर्ग ९ च्या विद्यार्थ्यांकडून निरोप देण्यात आला.

पाचव्या वर्गात विद्यार्थी शाळेत दाखल झाल्यानंतर तो सहा वर्ष त्याच शाळेत अध्ययनाचे धडे घेत असतो. शाळेतील शिक्षक, वर्गमित्र, शाळेतील सर्व घटक, व शाळेचा परिसर यांच्याशी विद्यार्थ्यांचे ऋणानुबंध जुळलेले असते. वर्ग दहावीची बोर्ड परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील अनेक पायरी पैकी महत्त्वाची व प्रथम पायरी असते. त्यामुळे निरोप समारंभ हा विद्यार्थ्यांकरता एक भावनिक क्षण असतोच परंतु सहशालेय उपक्रमाचाच तो एक भागही ठरतो.

शैक्षणिक सत्र २०२४-२५ मधील वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांकरीता निरोप समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना निरोप देण्याची परंपरा शाळेने जपली आहे.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक विनोद कहारे , प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त जि. प शिक्षक विनोद दंडारे व जि. प. शिक्षिका हर्षलता बैगणे या होत्या. शाळेचे उपमुख्याध्यापक रवींद्र डोंगरदेव , पर्यवेक्षक चंद्रशेखर गिऱ्हाळे ,कनिष्ठ महा. विभाग प्रमुख सचिन दिघडे, वर्ग १० वी चे सर्व वर्गशिक्षक, विद्यार्थी प्रतिनिधी या सर्वांची विचारपीठावर उपस्थिती होती.

सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व द्वीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतमध्ये अध्ययन अध्यापनातील काही अनुभव हळवेपणाने आणि भावनिकतेने व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याकरता आपले आपले शालेय अनुभव व्यक्त केले. आपले शिक्षक,तत्कालीन शिक्षकांनी केलेली शिक्षा आणि त्यातून झालेली स्वतःची जडणघडण व स्वत:च्या करिअर विषयीचे आत्मकथन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या.  विचापीठावरील सर्व पाहुण्यांनी व मा. मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता शुभेच्छा देऊन भविष्यातील वाटचाली करिता मार्गदर्शनपर संदेश दिलेत.

   याप्रसंगी वर्ग ९ व १० च्या सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता वर्ग ९ चे सर्व विद्यार्थी, शाळेतील सर्व शिक्षक - शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वर्ग ९ च्या विद्यार्थ्यांनी केले.