घरोघरी औषध घेऊन येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करा:जिल्हाधिकारी विनय गौडा

प्रतिनिधी मोहम्मद नासीर चंद्रपूर
हिवताप सार्वत्रिक औषधोपचार मोहीम व राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम
चंद्रपूर : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दूरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम व टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी मोफत औषध वितरीत करण्यात येणार आहे. आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांना सहकार्य करून सदर मोहीम १००% यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विषयक मोहिमांचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललित पटले व इतर अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, सार्वत्रिक औषधोपचार मोहीम प्रभावीपणे राबविणे तसेच हत्तीरोग दूरीकरणासाठी या मोहिमेत लोकसहभाग वाढविणे आवश्यक आहे. हत्तीपाय झाल्यास उपचार होणे शक्य नसल्यामुळे सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेदरम्यान आपल्याकडे येणाऱ्या आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या प्रतिबंधात्मक गोळ्या त्यांच्या समोरच खाव्यात व स्वतःला या आजारापासून दूर ठेवावे.पुढे ते म्हणाले, १०० दिवस क्षयरोग मोहीम राबविण्यासाठी नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करून मोहीम यशस्वी करावी. तसेच क्षयरोगावर औषध उपचार घेत असलेले रुग्णांना दानशूर नागरिकांनी पोषण आधार किट देऊन निक्षयमित्र बनण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी केले आहे.