जिल्हाधिकारी रमले विद्यार्थ्यांसोबत, अंगणवाडी व आश्रमशाळेत संवाद

Thu 06-Mar-2025,03:38 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

चंद्रपूर : राज्य शासनाच्या सात कलमी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बुधवारी आश्रमशाळा तसेच अंगणवाडी येथे भेट देऊन चिमुकल्यांशी संवाद साधला. यावेळी चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी गौडा यांनी चंद्रपूर तालुक्यातील इंदपवार आदिवासी आश्रम शाळा बोर्डा येथे भेट देऊन आश्रमशाळेची पाहणी केली. तसेच विद्यार्थी व कर्मचारी यांचेशी संवाद साधला. तसेच आदिवासी आश्रम शाळा बोर्डा येथे सुरू असलेल्या नवीन बांधकाम इमारतीची पाहणी केली. विद्यार्थ्यार्थ्यांची अभ्यासाच्या प्रगतीबाबत चौकशी केली.तसेच मौजा पाहामी येथील अंधारी नदीवर सुरू असलेल्या नवीन उडान पुलाची पाहणी करून जिल्हाधिका-यांनी बांधकामाबाबत आढावा घेतला. यावेळी त्यांनी अंधारी नदीपासून दीड किलोमिटर अंतरावर असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वसलेल्या पाहामी गावात जाऊन गावातील नागरीकांची भेट घेतली. सदर भेटीदरम्यान पहामी येथील अंगणवाडी केंद्रातील सेविकेशी व शिकत असलेल्या विद्यार्थ्याशी संवाद साधून व्यवस्थेचा आढावा घेतला.जिल्हाधिकारी प्रथमच गावात आल्याने सर्व गावकरी भारावून गेले. यावेळी कोळसा ग्रामपंचायतीचे सरपंच माधुरी वेलादी, पोलीस पाटील भिमराव सोयाम, अंगणवाडी सेविका माया सोयाम तसेच गावातील अन्य नागरीक उपस्थित होते.