सामाजिक बांधिलकीतून सुरक्षित झाले निराधार महिलेचे घर

Tue 11-Feb-2025,01:34 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी मोहम्मद नासीर चंद्रपूर 

चंद्रपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा मिशन आधार उपक्रम

चंद्रपूर : सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरच्या वतीने तयार करण्यात आलेल्या मिशन आधार उपक्रमाच्या माध्यमातून निराधार महिलेला ६० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. या रकमेतून निराधार महिलेचे घर सुरक्षित झाले आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी मिशन आधार नावाचा व्हॉटसअप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या सर्व अधिकारी/कर्मचारी, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, इतर कर्मचारी तसेच गृहपाल व अनुदानित आश्रमशाळेचे कर्मचारी तसेच संस्थाचालकांचा समावेश आहे.सदर ग्रुप हा गरजु,वंचित,निराधार व अपंगाना मदत करण्यासाठी मानवीय दृष्टीकोनातून तयार करण्यात आला आहे. एक महिन्यापूर्वी चंद्रपुर येथील रहिवासी महिला शिला बालाजी कुमरे, या विधवा व अपंग असून त्यांची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे. त्यांच्या घराचे छत पडण्यावर आलेले आहे, अशी माहिती जितेश कुळमेथे यांनी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांना दिली.राचेलवार यांनी सदर मॅसेज व घराचा फोटो अधिकारी/कर्मचारी गृपवर पाठविला व सर्वांना या गरजु कुटुंबाला मदत करण्याचे आवाहन केले. प्रकल्प कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी, शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक तसेच अनुदानित आश्रम शाळेचे संस्था प्रमुख मंगेश चटप, मनोहर चटप,प्रशांत चटप तसेच बजाज, तसेच प्रकल्प कार्यालयातील काही पुरवठादार या सर्वांनी मिळुन ६० हजार रुपयाची मदत गोळा केली.ही रक्कम प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, डी. के. टिंगुसले, एस.डी. जगताप, लेखाधिकारी तसेच एस. एस. पाटील, यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत निराधार महिलेला देण्यात आली. या आर्थिक मदतीतून शिला बालाजी कुमरे या महिलेच्या घराची दुरुस्ती करावयाची जबाबदारी जितेश कुळमेथे यांना देण्यात आली व त्यानुसार सदर महिलेच्या घराची छताची व पक्की दुरुस्ती करण्यात आली.