कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस 1 जूनपासून नव्या रूपात धावणार अनेक वर्षाची प्रतीक्षा संपणार एलएचबी कोचमधून प्रवाशांना सोय

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगाव
गोदिया : राज्यातील सर्वाधिक लांब अंतर धावणारी कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस आहे. 1 नोव्हेंबर 1971 पासून महाराष्ट्र एक्स्प्रेस सुरू झाली होती. रेल्वेच्या आधुनिकीकरणाबरोबर तब्बल 54 वर्षांनंतर एलएचबी कोच नव्या रूपात धावणार आहे. 1 जूनपासून या मार्गावर एलएचबी कोचची नवी रेल्वे उपल्ब्ध झाली असून आता प्रवाशांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत.महाराष्ट्र राज्यांतर्गत सर्वाधिक 12 जिल्ह्यातून 1341 कि.मी. चा प्रवास करीत कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस धावते. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, जळगाव, अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा या 12 जिल्ह्यांतून प्रवाशांना सोयीचे आहे. दररोज दुपारी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून 2.45 वा. सुटते आणि दुसर्या दिवशी सायं. 6 वा. गोंदिया येथे पोहोचते. या दरम्यान तब्बल 62 स्थानकांहून प्रवाशी घेत आपला मार्ग पूर्ण करीत असते.रेल्वे प्रवाशांकरिता महाराष्ट्र एक्सप्रेस 1 जूनपासून कात टाकणार आणि आपल्या नवीन स्वरूपात धावणार आहे. मध्य रेल्वे प्रवासी सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत गाड्यांमधील जुने रॅक आधुनिक लिंक हाफमन बूश डब्यांमध्ये रूपांतरित केले जात आहेत. या ट्रेनमध्ये 1 द्वितीय वातानुकूलित कोच, 4 तृतीय वातानुकूलित कोच, 7 स्लीपर कोच, 4 सामान्य द्वितीय श्रेणी कोच, 1 सामान्य द्वितीय श्रेणी कोच आणि 1 जनरेटर कार असेल. या बदलामुळे प्रवाशांना पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी,सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून 1 जून 2025 पासून एलएचबी कोच आणि नवीन संरचनेसह धावेल. गोंदिया-कोल्हापूर एक्स्प्रेस 3 जून 2025 पासून गोंदिया रेल्वेस्थानकावरून एलएचबी कोच आणि नवीन संरचनेसह धावणार आहे.महाराष्ट्र एक्स्प्रेसचे थांबे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून सुटून ती वळिवडे, रुकडी, हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, सांगली, भिलवडी, किर्लोस्करवाडी, ताकारी, भवानीनगर, कराड, मसूर, तारगाव, रहिमतपूर, कोरेगाव, सातारा, जरंडेश्वर, वाठार, लोणंद, निरा, जेजुरी, आंबले, घोरपडी, पुणे, उरळी, कोडगाव, दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, पुणतांबा, कोपरगाव, येवला, मनमाड, नंदगाव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, बोदवड, मलकापूर, नांदुरा, जलंब, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम,तुलजापूर, शिंदी अंजनी,नागपूर, इतवारी,कामठी,भंडारा रोड तुमसर रोड,तिरोडा अशी स्थानके घेत गोंदियाला जाते.