मनपातर्फे पोषण आहाराविषयी करण्यात आली जनजागृती

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
चंद्रपूर : चंद्रपुर शहर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे २०२४-२०२५ या वर्षात एकुण ६३० बाह्य शिबिरे घेण्यात येऊन गरोदर माता, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींना पोषण आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.मनपा आरोग्य विभागांतर्गत सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत नागरी आरोग्य व पोषण दिवस/अर्बन हेल्थ न्युट्रिशन डे (UHND) वर्षभर साजरा करण्यात येत असतो. त्या अनुषंगाने पोषण आहारा विषयी प्राधान्याने झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात येत असते. २०२४-२०२५ या वर्षभरात शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका मार्फत प्रत्येक झोन व अंगणवाडीमध्ये अंदाजे ६३० बाह्यसत्र (UHND) घेण्यात आले.या सत्रांमध्ये गरोदर माता, स्तनदा माता व किशोरवयीन मुली यांचा प्रामुख्याने समावेश होता. पोषण आहारामध्ये समतोल आहार जसे की पालेभाज्या, फळे, दुध, अंडे, मोड आलेले कडधान्य इत्यादी फुड पीरॅमिडनुसार प्रदर्शन ठेवून त्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. किशोरवयीन मुलींना मासीक पाळी दरम्यान स्वच्छता पाळण्या विषयीच्या सुचना देण्यात आल्या.तसेच वर्षभर झालेल्या सर्व सत्रांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर जसे लोहयुक्त आहार, प्रोटीन युक्त आहार, कुटूंब नियोजनाचे साधने, स्तनपान, जलजन्य, किटकजन्य आजार, सिकलसेल, कुष्ठरोग, टि.बी, कॅन्सर आणि जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना इत्यादी विषयांवर सविस्तर माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. सत्रात उपस्थित लाभार्थ्यांना शेंगदाणा चिकी, राजगिरा लाडु व केळी वाटप करण्यात आले.सदर सत्र हे आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ. अश्विनी भारत, डॉ. विजया खेरा, डॉ जयश्री वाडे, डॉ.अर्वा लाहेरी, डॉ. योगेश्वरी गाडगे, डॉ. शरयू गावंडे,डॉ.नेहा वैद्य,डॉ. घोषणा कोराम, डॉ. उत्कर्षा कारमोरे तसेच आरोग्य सेविका, आशा वर्कर यांच्या सहकार्याने पार पडले.