आरमोरीकरांचा पाणीप्रश्न तत्काळ सोडवा मुख्याधिकारी यांना दिले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): गेल्या चार दिवसांपासून आरमोरी नगर परिषदेच्या अंतर्गत येत असलेल्या सिताबर्डी, विठ्ठल मंदिर,शिवाजी चौक,शेगाव (बाजारपेठ)व इतरही भागात नगरपरिषदेद्वारे होत असलेला पाणीपुरवठा ठप्प झाला होता.पाणी ही जीवनावश्यक गरज असल्यामुळे व विविध कामांसाठी त्याचा वापर होत असते.मात्र या पाण्याने गृहिणी, कामगार स्त्रीया यांच्या डोळ्यात पाणी आणले.सदर बाब संबंधित प्रशासनाला अवगत करुन तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते महिला पुरुष यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आरमोरी शहराची लोकसंख्या लक्षात घेता,त्यांच्या जलपूर्तीसाठी दशलक्ष मिलीमीटरहून अधिक पाण्याची नितांत आवश्यकता आहे.आरमोरीतील बर्डी,शेगाव (बाजारपेठ), विठ्ठल मंदिर मंदिर, शिवाजी चौक व इतर परिसरात गाढवी व वैनगंगा नदीपात्रात बांधलेल्या जलकुंभातून नळजोडणीद्वारे सार्वजनिक व घरगुती नळ वाहिनींना पाणी पुरवठा केला जातो.सद्यस्थितीत मार्च महिना सुरू आहे.या मार्चपासून वातावरणात बदल होत आहेत.त्यामुळे सर्वत्र तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे.मागील फेब्रुवारी व सुरू असलेल्या मार्च महिन्यात नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाद्वारे नियमित व व्यवस्थित पाणीपुरवठा केला जात नाही.नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झालेली आहे.तसेच कधी तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठ्यात अनियमितता येत आहे.ही बाब सर्वांना माहीत आहे.मात्र, सद्यःस्थितीत संबंधित सिताबर्डी व इतर परिसरात गेल्या चार दिवसांपासून पाण्याचा एकही थेंबही नागरिकांना मिळाला नाही. सौर उर्जेवर सुरु असलेले सार्वजनिक नळही कुचकामी ठरत आहेत.दैनंदिन कामांकरिता पाणी आवश्यक असल्यामुळे गृहिणी व कामगार स्त्रीया तसेच त्यांचे कुटुंबीयांना पाणी भरण्यासाठी मौल्यवान वेळ नाहक खर्च करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्या घरगुती व इतरही व्यावसायिक कामांचा खोळंबा होत आहे.तसेच नगरातील विविध समस्या आजही कायम आहेत.त्यात जुन्या लेआऊट मधील रस्ते, तुंबलेल्या गटारी,रामसागर जवळील अस्वच्छता व इतर प्रश्न यावर लक्ष वेधले.त्यामुळे संबंधित बाबींवर नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाद्वारे तातडीने उपाययोजना कराव्यात व नागरिकांना स्वच्छ,आरोग्यप्रद तसेच पुरेशा प्रमाणात वेळापत्रकानुसार नियमित पाणीपुरवठा करावा अशी एकमुखी मागणी आरमोरी संघर्ष समितीचे सदस्यांचे उपस्थित शिष्टमंडळाने नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदन देताना दिलीप हाडगे,रणजित बनकर,शालीक पत्रे,विलास गोंदोळे,राहुल जुआरे,अंकुश गाढवे, महेंद्र मने,विभा बोबाटे, शुभांगी गराडे,संध्या मारोडकर,अनिता मारोडकर,भावना सहारे, लता डडमल,किरण निमजे, सुनंदा दुमाने,उर्मिला साखरे,लक्ष्मी मने,सारीका कांबळे,आदी उपस्थित होते.आरमोरीकर जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नी संबंधित विभागाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देत असून नियमित वेळापत्रकानुसार लवकरच पाणी मिळेल.आवश्यकतेनुसार टॅंकरने त्या त्या विभागात पाणीपुरवठा करण्यात येईल.यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे.मुख्याधिकारी नगर परिषद आरमोरी