समाजाभिमुख शिक्षणाची वाटचाल आदिवासी जीवनाच्या अनुभवातून विद्यार्थ्यांमध्ये जागृती

Tue 08-Apr-2025,03:15 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली 

भामरागड :-पदव्युत्तर शैक्षणिक इंग्रजी विभाग आणि आदिवासी अध्यासन केंद्र, गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने दुसरे' कम्युनिटी आऊटरीच प्रोग्राम' अनुभूती यशस्वीरीत्या भामरागड आणि लोकबिरादरी प्रकल्प येथे दि. १९ व २० मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात आले.या दोन दिवसीय उपक्रमात विद्यार्थ्यांना आदिवासी साहित्य, संस्कृती आणि ग्रामीण विकास कार्यांची प्रत्यक्ष ओळख करून दिली गेली. विद्यार्थ्यांना आदिवासी जीवनशैली, त्यांच्या सांस्कृतिक परंपरा आणि साहित्यिक संवादयांचा प्रत्यक्षअनुभव घेता आला. तसेच, भामरागडच्या विविध आदिवासी समुदायांच्या जीवन शैलीची माहिती तसेच लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या जीवन संघर्ष व भामरागड परीसरातील वैद्यकीय आणि सामाजिक योगदानाचे प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना संवाद कार्यक्रमाद्वारे प्राप्त झाले.विद्यार्थी अभ्यास भेट उपक्रमाचे उद्घाटन आदिवासी कवी व लेखक दादाजी कुसराम यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाने झाले तसेच विद्यार्थ्यांना आदिवासी साहित्यरचना, कथा, कविता आणि लोक परंपरांच्या जतनाचे महत्त्व सांगितले व आदिवासी जीवन संघर्षस्वलिखित साहित्याच्या मांडणीतून अधोरेखित केला.प्रमुख उपस्थिती डॉ. हेमराज लाड, प्राचार्य, राजे विश्वेश्वरराव महाविद्यालय, भामरागड यांनी आदिवासी साहित्य व परंपरा जतन करण्यात युवकांची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार असल्याचे सांगितले आणि संशोधनात्मक माहिती समोर आणणे आवश्यक असल्याचे मत मांडले.'कम्युनिटी आऊटरीच प्रोग्राम' विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक अनुभवच देत नाही,तर त्यांच्यात सामाजिक जाणिवेचा विकास करण्यासही मदत करतो. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक विविधता,परंपरा व भाषिक ज्ञान समजण्यास व जतन करण्यास महत्त्वाची भूमिका पार पडेल,असे प्रतिपादन डॉ. विवेक जोशी, विभागप्रमुख, इंग्रजी विभाग यांनी केले.लोक बिरादरी येथील प्रेरणादायी विद्यार्थी संवाद कार्यक्रमात, डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी आपल्या जीवनसंघर्षाची आणि भामरागड परीसरातील आदिवासी समाजासाठी केलेल्या वैद्यकीय व सामाजिक योगदानाचे अनुभव कथन विद्यार्थ्यांना केले. त्यांनी भामरागड सारख्या दुर्गम भागात अडचणींना तोंड देत समाजाची सेवा कशी केली यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांना भामरागड आणि आसपासच्या आदिवासी समुदायाच्या आरोग्य आणि सामाजिक स्थितीवर व डॉ. आमटे दांपत्याच्या समर्पितकार्यामुळे हजारो आदिवासी कुटुंबांना आरोग्यसेवा, शिक्षण, आणि सामाजिक बदल यावर संवाद माध्यमातून समजण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला.या उपक्रमाद्वारे आदिवासी समाजाच्या शाश्वत विकास धोरण व परंपरा जतन करण्यासंदर्भात विचारमंथन केले गेले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिककार्य आणि समाजसेवा करण्याची प्रेरणा निर्माण होण्यास अभ्यास भेट उपक्रम महत्त्वाची भुमिका पार पाडणार आहे. अभ्यास भेट उपक्रम समन्वयक प्रा. अतुल गावस्कर, डॉ. वैभव मसराम, समन्वयक, आदिवासी अध्यासन केंद्र, डॉ. शिल्पा आठवले, डॉ. प्रमोद जावरे यांनी उपक्रमाच्या यशस्वीते करिता महत्त्वाची भुमिका पार पाडली, व पी. जी. टी.डी. विभाग आणि महाविद्यालयीन प्राध्यापक व विद्यार्थी बहु संख्येने उपस्थित होते.