जांगोणा शाळेचे तीन विद्यार्थी नवोदय पात्र

अब्दुल कदीर बक्श ( हिंगणघाट )
हिंगणघाट तालुक्यातील पोहणा केंद्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जांगोणा येथील तीन विद्यार्थी सलग तिसऱ्या वर्षी यशाची हॅट्रिक साधत जवाहर नवोदय विद्यालय वर्धा येथे इयत्ता सहावीसाठी प्रवेश पात्र झाले आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा यशाची परंपरा कायम राखत प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरले असून त्यांच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. पात्र झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कार्तिक गजानन मोहर्ले, चिराग रविंद्र वावधणे व कु. ज्ञानेश्वरी नागो भेंडारे यांचा समावेश आहे. यांनी अत्यंत जिद्द आणि मेहनतीने अभ्यास करत हे यश मिळविले आहे. त्यांचे मार्गदर्शक शिक्षक गणेश नवघरे आणि पालकांचेही योगदान मोठे आहे. नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविणे हे स्पर्धात्मक वातावरणात मोठे यश मानले जाते. आतापर्यंत या शाळेचे सात विद्यार्थी नवोदयला प्रवेशित झाले आहेत.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मुख्याध्यापक नरेश चौधरी, प्रदीप ताटेवार, नितीन खोडे व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक गणेश नवघरे यांना दिले आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.