जलालखेडा येथील 108 रुग्णवाहिका 7 दिवसांपासून बंद

प्रतिनिधी साजिद पठान नागपुर
जलालखेडा (ता. 26) 108 रुग्णवाहिका वेळेवर मिळत नसल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने खासगी वाहनासाठी रुग्णांना पैसे मोजावे लागत आहे. जलालखेडा हे गाव नागपूर ते अमरावती या महामार्गावर असून इथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. महामार्गावर होणाऱ्या अपघातातील रुग्णांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले जाते. गंभीर असणाऱ्या रुग्णाला उपचारासाठी नागपूर येथे पाठवावे लागते. परंतु वेळेवर 108 रुग्णवाहिका मिळत नसल्याने खासगी वाहन मिळेपर्यंत रुग्णाला तिथेच ताटकळत थांबवावे लागत आहे. जलालखेडा येथील 108 रुग्णवाहिका गेल्या 7 दिवसांपासून बंद असल्यामुळे येणाऱ्या रुग्णांसाठी खासगी वाहनांची सोय करावी लागत आहे. शुक्रवारी संध्याकाळी 8 च्या सुमारास एका महिलेले हृदय विकाराचा झटका आला तिची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी नागपूर येथे न्यायला सांगितले.108 रुग्णवाहिकेला कॉल केला असता एकही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही शेवटी काही वेळानी खासगी वाहनाने त्या महिलेला नागपूर येथे पाठवावे लागले. रुग्णवाहिकेत असलेली ऑक्सिजनची व्यवस्था खासगी वाहनात नसल्यामुळे रुग्णांना आपला जीव मुठीत घेऊन खासगी वाहनाने जावे लागत आहे. त्यामुळे जलालखेडा सारख्या गावात 24 तास रुग्णवाहिका उपलब्ध असणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सुदृढ असणे काळाची गरज आहे.
आमदाराची रुग्णवाहिका वेळेवर मिळेना.
नरखेड काटोल विधान सभा क्षेत्रात आमदार व माजी आमदार यांची रुग्णवाहिका आहे.या दोन्ही रुग्णवाहिकेला फोन केला असता एका रुग्णवाहिकेवर चालक नसल्याचे तर दुसरी रुग्णवाहिका बंद असल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स,
जलालखेडा येथील रुग्णवाहिकेत मोठा बिघाड झाला असून 2 ते 3 दिवसात तिचे काम पूर्ण होईल व ती सेवेत येईल.
प्रबंधक 108 रुग्णवाहिका.