अल्लीपुरात अतिक्रमण व्यावसायिकांची वाढ, ग्रामपंचायत कारवाई करणार काय

प्रतिनिधी : सुनिल हिंगे ( अल्लिपुर )
हिंगणघाट तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून अल्लीपूर गावाची ओळख आहे. येथे ग्रामपंचायतीची निवडणूक न झाल्याने प्रशासक आहे. याच प्रशासक राजमध्ये सध्या अतिक्रमण व्यावसायिकांनी झपाट्याने पाय पसरायला सुरूवात केली आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून त्यांच्याकडून कारवाई होणार काय, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत. अल्लीपुरातील गळोबा वॉर्डमध्ये बैल बाजारालगत काही व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे.
या अतिक्रमणावर कारवाई करण्याकरिता ग्रामपंचायतीचे प्रशासक व ग्रामपंचायत अधिकारी असा मोठा फौजफाटा या परिसरात दाखल झाला होता. मात्र, सदर अतिक्रमण न काढताच प्रशासक तुषार जोगी व ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय दिवटे खाली हाताने परतल्याने अनेक चर्चाना उधाण आले आहे. कारवाईकरिता गेलेले अधिकारी माघारी का परतले, असाही प्रश्न चर्चिला जात आहे.
गळोबा वॉर्डमधील बैलबाजार परिसरात अतिक्रमण वाढत असून कारवाईकडे कानाडोळा होत आहे.
अतिक्रमणास मिळतोय राजाश्रय अल्लीपूर ग्रामपंचायतीमार्फत बैलबाजार येथे सौंदर्याकरण करण्याकरिता पाच लाख रुपयांचा निधी बैल बाजारामध्ये खर्च करण्यात आला आहे. या भागामध्ये दिवसेंदिवस अतिक्रमणात झपाट्याने वाढ होत आहे. मात्र एका राजकीय पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे हे अतिक्रमण न काढताच अधिकारी परतल्याने दबावातूनच हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.
( गळोबा वॉर्डातील बैल बाजार परिसरात अतिक्रमण वाढत असल्याची माहिती मिळाल्याने पाहणी करण्याकरिता गेलो होतो. येत्या काही दिवसांत आम्ही अतिक्रमणावर रितसर कारवाई करून परिसर मोकळा करणार आहे.तुषार जोगी प्रशासक ग्रामपंचायत अल्लिपुर )