महाकाली यात्रेसाठी 2 कोटी 90 लक्ष रुपयांचा निधी सोयीसुविधांसाठी विशेष प्रयत्न

Sat 29-Mar-2025,08:48 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

आ.सुधिर मुनगंटीवार यांच्याकडून महाकाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परीसराची पाहणी

महाकाली यात्रेतील दुकाने नियोजनबद्ध रेखांकन करुन निश्चित केली जाणार

चंद्रपूर : दिनांक. 29 मार्च चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने महाकाली मंदिर येथे मोठ्या उत्साहात यात्रा होत असते. महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमधून भाविक मोठ्या श्रद्धेने येथे हजेरी लावतात. माता महाकालीला साष्टांग दंडवत करून भक्त झरपट नदीत स्नान करतात. नदीतील पाण्याला तीर्थाप्रमाणे महत्त्व आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यात्रेचे व नदीचे पावित्र्य जाणून यात्रेकरूंच्या सोयीसुविधांसाठी पुढाकार घेतला आहे. महाकाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मंदिर परिसराची शनिवारी ( दि.२९) पाहणी केली.या यात्रेच्या नियोजनासाठी आणि सोयीसुविधांसाठी राज्य सरकारने मोठा आर्थिक हातभार लावला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी यात्रेसाठी 2 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून भाविकांसाठी विविध सुविधा उभारण्यात येत आहे. झरपट नदी परिसराची स्वच्छता करण्यात आली असून उर्वरित स्वच्छतेचे काम देखील सुरू आहे. भविष्यात यात्रेसाठी स्थायी यंत्रणा निर्माण करण्याचे नियोजन प्रशासनाने आखले असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले. आ. मुनगंटीवार यांच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी भाजपा महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, महामंत्री सुरज पेद्दुलवार,सोहम बुटले,मनपाचे शहर अभियंता बोरीकर,संदीप आगलावे, पुरुषोत्तम सहारे, रवी लोणकर, दिनकर सोमलकर आदींची यावेळी उपस्थिती होती.यात्रेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आ.मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांसोबत विशेष चर्चा देखील करण्यात आली आहे. भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारल्यास यात्रा अधिक भक्तीमय आणि पवित्र वातावरणात पार पडेल,असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

महाकाली यात्रेतील दुकाने नियोजनबद्ध रेखांकनातून निश्चित केली जाणार

महाकाली यात्रेदरम्यान अनेक छोटे-मोठे दुकानदार आपला व्यवसाय करतात आणि भक्तांची सेवा करतात. मात्र, अलीकडे प्रशासनाच्या नियमांमुळे काही व्यापाऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. यासंदर्भात व्यवस्थापन योग्य व्हावे आणि गेल्या 40 ते 50 वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये,यासाठी आ.मुनगंटीवार यांनी महाकाली मंदिर परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या परिसरातील कोणतीही दुकाने हटविण्यात येणार नाहीत, ती पूर्वीप्रमाणेच राहतील. मात्र, दुकाने रस्त्यावर येऊ नयेत यासाठी नियोजनबद्ध रेखांकन करून त्यांची निश्चित मर्यादा प्रशासनाकडून ठरवली जाणार असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.