जिल्हाधिकाऱ्यांकडून जिवती तालुक्यातील विकास कामांची पाहणी

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
चंद्रपूर : १०० दिवस कृती आराखडया अंतर्गत जिल्हास्तरीय अधिकारी यांनी आठवड्यातून किमान दोन दिवस क्षेत्रीय भेटी दरम्यान केंद्र व राज्य शासनाच्या प्रकल्पांना भेटी देवून कामाच्या प्रगतिची पाहणी करावी, अशा राज्य शासनाच्या सुचना आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी जिवती तालुक्यातील मौजा पिट्टीगुडा येथील नॅडेप बंधारा खोलीकरण प्रकल्पाची पाहणी केली, पिट्टीगुडा येथील ऑक्सीजन पार्क येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.तसेच नागरिकांनी सांगितलेल्या समस्यांची तात्काळ दखल घेवून त्यांचे निराकरण करण्याच्या सुचना संबंधित यंत्रणेला दिल्या.यावेळी राजुऱ्याचे उपविभागीय अधिकारी रविंद्र माने,तहसिलदार रुपाली मोगरकर,सहा. गटविकास अधिकारी दोडके, पिट्टीगुड्याचे सरपंच बाबुराव काशिराम पवार व गावातील नागरिक उपस्थित होते.तसेच यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिवती तालुक्यातील ३६५ दिवस चालणारी जि.प.उच्च प्राथमिक शाळा,पालडोह येथे भेट देवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. शाळेचे मुख्याध्यापक परतेकी यांच्या कामाची प्रशंसा केली.शाळकरी विद्यार्थ्यांनी दिव्यांका हिने जिल्हाधिकारी यांची मुलाखत घेतली.यावेळी जिल्हाधिकारी यांनी मौजा शेणगाव येथिल आदर्श शाळा बांधकामाची पाहणी केली.पाहणीदरम्यान शाळेचे बांधकाम एक वर्षात पूर्ण करणेबाबत अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.