१ लाख १६ हजार रुपयांच्या डिझेलसह ६ लाख १६ हजार रुपयांचा माल जप्त

Sun 10-Nov-2024,04:34 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर           

बल्लारपूर : राजुरा -बल्लारपुर मार्गे चंद्रपूरला घेऊन जाणाऱ्या १ लाख १६ हजार ५५० रुपयांचे डिझेल बल्लारपूर पोलिसांनी जप्त केले असून अल्पवयीन चालकाला ताब्यात घेतले आहे . बल्लारपूर पोलिसांनी ही कारवाई आज ९ नोव्हेंबर सकाळी ८.३०वाजता बामणी एसएसटी पाँइंट येथे केली आहे. राजुरा येथुन पिकअप वाहन मध्ये चोरीचे डिझेल नेले जात असल्याची माहिती खोऱ्याने बल्लारपूर पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे बल्लारपूर पोलिस स्टेशन चे ठाणेदार सुनील गाडे व गुन्हे शाखेच्या पथकाने बामणी येथे नाकाबंदी लावली . नाकाबंदी दरम्यान संशयास्पद पिकअप क्र. एमएच ३४ बीझेड ४८१८ येत असल्याचे दिसले असता त्यास थांबवून त्याची झडती घेण्यात आली. झडती दरम्यान ३८ कॅनमध्ये १ लाख १६ हजार ५५० रुपयांचे १ हजार २९५ लीटर डिझेल जप्त करण्यात आले. हे वाहन अल्पवयीन आरोपी चालवत होता असून तो पोलीस चौकशीत समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही, त्यामुळे पोलिसांनी ५ लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन आणि १ लाख १६ हजार ५५० रुपये किमतीचा डिझेल असा एकूण ६ लाख १६ हजार ५५० रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलीसांनी बीएनएस, जीवन आवश्यक वस्तु व मोटर वाहन कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. 

सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुनील गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलम बाबर, पोलीस उपनिरीक्षक हुसेन साह, सफौ गजानन डोईफोडे, हवालदार रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, बाबा नैताम, वशिष्ठ रंगारी, यशवंत कुमरे, प्रकाश मडावी, दयाळ कुकुडकर महिला पोलीस कर्मचारी वीणा तसेच एस एस टी पॉइंट चे विकास भगत ज्येष्ठ सहाय्यक पंचायत समिती बल्लारपूर, साहेबराव पवार आरोग्य सहाय्यक पंचायत समिती बल्लारपूर सह आदींनी केली आहे.